शेवटच्या प्रश्नचिन्हांतच एक अर्थ दडला आहे. मराठी भाषा लवचिक आहे.
मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, मागण्या पूर्णच झाल्या पाहिजेत आणि मागण्याच पूर्ण झाल्या पाहिजेत?(बाकीच्या गोष्टी नगण्य)
या प्रश्नामागे म्हणजे इथे मला तरी वाटत की मागणी योग्य की अयोग्य? आवाक्यात की आवाक्याबाहेर? कोणत्या मागण्या, कशासाठी? वैयक्तिक की सामाजिक?
हा विचार असणे गरजेचे आहे.
कारण मागणी ही विविध प्रकारची असू शकते. दुसऱ्याची मागणी ही एखाद्याला अमान्य असू शकते म्हणजेच मागणी कोण करतं आहे आणि का? हे तितकेच महत्त्वाचे आहे. विरोधाभास नको.
एकाच्या हातचे खेळणे हिसकावून दुसर्याला देणे. अशी मागणी पूर्ण करणे हे अयोग्य आणि चुकीचे आहे.
कारण मागणी जितकी महत्त्वाची तितका पुरवठाही योग्य मार्गाने होतो आहे हे बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे. नाहीतर काहीच साध्य होणार नाही. अराजकता माजेल.
अपूर्ण मागणी क्लेश, दुःख, वेदना देते.
सध्या मुले आणि तरुणाई त्यांच्या मागण्यांबाबत अतिशय आग्रही झाले आहेत. मग तो मोबाईल असो की बाईक असो. त्यासाठी ते काहीही करु शकतात अगदी चोरीसुद्धा! प्रेयसीला आवडतं म्हणून एक मुलगा रोज वेगवेगळ्या बाईक्स चोरायचा आणि तिची इच्छा पूर्ण करायचा. अर्थात शेवट वाईट होता. ही मागणी पूर्ण होणे आवश्यक होते का? तर नाही आणि अवलंबलेला मार्ग ही चूक होता.
बरेच लोक सतत दुसर्याकडे पैशाची मागणी करत असतात. कारण योग्य असेल, गरज असेल तर ती मागणी पूर्ण होणे आवश्यक आहे पण कारण आणि गरज दोन्ही अयोग्य असेल तर ती मागणी पूर्ण न झालेलीच बरी! लुबाडणे हे मागणी पूर्ण करण्याचे माध्यम होऊ नये असे वाटते. मागणीतही पारदर्शकता हवी.
कुटुंबात ही मागणी सतत डोके वर काढत असते आणि त्यामुळे एखाद्या गरीब बापाच्या जीवाला घोर लागतो.
*प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे*
*कोड किंचीत पुरविता न ये त्यांचे*
*तदा बापाचे हृदय कसे होते*
*न ये वदता, अनुभवी जाणती ते!*.
गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या..
या ओळी डोळ्यात पाणी आणतात.
मग गरीबाने नेहमी मन मारुनच जगायचे का?
भौतिक सुख खरंच महत्त्वाचं नसतं का? सतत आत्मिक सुख समाधान देतं का? पूर्ण न होणाऱ्या इच्छांची दाहकता माणसाला जाळून काढते. कसचा लेप तो दाह शांत करतो?
जगातील चकाचौंध डोळे दिपवते आणि एकेक मागणी मनात रुतून राहते.
*राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली*
*ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥*
हे किती वास्तवाला धरून आहे? भौतिकतेच्या मागे धावणाऱ्या या जगासाठी? खरंच झोपडीत सुख गवसतं? की ते फक्त कविता आणि कथा, कादंबर्यांतच असतं?
आपल्या मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ आहोत ही भावना एका बापासाठी खरंच किती क्लेशदायक असते.
परिस्थिती वेगळी पण असू शकते. एखाद्या वडिलांना त्यांच्या मुलाकडून काही अपेक्षा असतात. इंजिनियर व्हावे किंवा डॉक्टर व्हावे. ती पण मागणी योग्य असतेच असे नाही.
घरात एखाद्या मुलाला राग आला की तो आईला म्हणतो की तो आज जेवणार नाही आणि मग आई पाघळते आणि त्याला हवं ते देते.पण योग्य असेल तरच!
(आई त्याच बारसं जेवली असते हे तो मुलगा विसरतो) नाही तर राहा उपाशी, हे म्हणायला आई कमी करत नाही.
मागणी या शब्दाची जाणीव एक डोळस आई तिच्या पाल्यात उत्तमपणे रुजवू शकते.
जिजाबाई, गांधारी या ऐतिहासिक आणि पौराणिक दाखल्यांतून योग्य ती शिकवण
आपण घ्यायची.
मागणीसाठी उपोषण आज हास्यास्पद झाले आहे.
मागणी योग्य असेल तरच ते मान्य होणे उपयुक्त आहे.
अर्थात उमेदवार जेव्हा मत मागायला येतो तेव्हा त्यालाही मतदारांच्या मागण्या काय आहेत याची जाणीव असावी आणि ती पूर्ण करण्याची इच्छा ही असावी.
बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट पुरे करणे खरंच महाकठीण असतं.
श्रीरामांनी चंद्र हवा म्हणून केलेली मागणी आणि सीतामातेने केलेली सोन्याच्या मृगाची मागणी सर्वांना ज्ञात आहे. पांडवांची पाच गावांची मागणी पूर्ण झाली असती तर?
सीतामातेची सोनेरी मृगाची मागणी श्रीरामांनी नाकारली असती तर?
म्हणजे कोणती मागणी पूर्ण व्हायला हवी यामागे सारासार विवेक, विचार, योग्य मार्गदर्शन, आर्थिक गणितं ह्या सर्व बाबी असतात.
आता मुद्दा हा की मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत?
तर हो कारण मागणी पूर्ण होणे म्हणजे थोडक्यात तो माणूस आणि समाज सर्वार्थाने सुखी होणे. अस्वस्थ समाज प्रगति करु शकत नाही आणि आळशी समाजसुद्धा! त्यामुळे माणसाने स्वतःच्या सामर्थ्यावर ह्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद ठेवावी कारण मागणीसाठी हात पसरला की समोरचा हात झिडकारु पण शकतो हे ध्यानात ठेवावे.