विनंती

विनंती

देवा मला एकच दान दे
परत एकदा पृथ्वीवर जाऊ दे
माझ्यावर झालेल्या अन्यायाचे
पुरावे मलाच देऊ दे

एक, चार की पाच
काय फरक पडतो
आक्रोश माझा कोणापर्यंत
पोहोचलाच नसतो

लालसा, हाव आणि क्रौयाने
जीव कोवळा दडपतो
अब्रूची लक्तरं वेचताना
बिचारा छिन्न भिन्न होतो

सारे पुरावे आता
होणार का रे नष्ट
अन्याय माझा होईल
फक्त एका सिनेमाची गोष्ट

चर्चा, वार्ता आणि
मूक मोर्चे, सारं आहे निष्फळ
पापी, जल्लाद निपजले
आहेत येथे पुष्कळ

म्हणून म्हणते निदान
एवढे एक कर,
धाड मला पृथ्वीवर
पुरावे द्यायला, खोलवरील
जखमांचे व्रण दाखवायला

मिळवायची आहे त्यांच्या
नजरेला नजर,
विचारायचा आहे जाब, खुपसायचा आहे त्यांच्या
उरात खंजीर, आरपार

जाळायचे आहे त्यांचे आत्मे परत न जन्माला येण्यासाठी,
वाचवायचे आहे एका तरी अबलेला, आयुष्यभरासाठी

जमलं तर देवा
थोडसं पुण्य तुझ्या ही पदरी पडू दे
माझ्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकदा तरी पृथ्वीवर जाऊ दे

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »