काहीतरी..

काहीतरी..

तुझ्या मनात माझ्या मनात
काहीतरी खुपतंय

माझ्या वागण्यावर तुझं
तिरकस बोलणं
जिव्हारी लागतंय,
संवादाला लागलेलं अबोल्याच
ग्रहण आता सुटेनास झालयं,

तुझ्या मनात माझ्या मनात
काहीतरी खुपतंय

डोळ्यांची भाषा रोजची
निरक्षर झाल्यासारखी भासतेय,
खाणा-खुणा नि
तिरके कटाक्ष
मौनात गेलेय, मन मात्र
काहीतरी ऐकायला आसुसतय

तुझ्या मनात माझ्या मनात
काहीतरी खुपतंय

अहंकाराच्या विखाराने
रागाची ठिणगी फुलतेय,
प्रेमाची फुंकणी बिचारी
कोपऱ्यात जाऊन बसलीय,
तिचं ते एकटेपण सारखं
सारखं खुणावतंय ,

तुझ्या मनात माझ्या मनात
काहीतरी खुपतंय

......कशाची ही नांदी आहे
जीव कासावीस होतोय
सुरवात होण्याआधी च
शेवटाकडे नेणारा रस्ता
चकव्यागत फिरवतोय

तुझ्या मनात माझ्या मनात
काहीतरी खुपतंय

दारी जमा झालेली गर्दी
का मला अशी हिणवतेय,
अधांतरी लटकलेल्या देहाची
कशासाठी एवढी तडफड होतेय,

माझ्या मनात काहीतरी खुपतंय

तुझ्या डोळ्यातला कोरडेपणा
माझ्या निष्प्राण देहात उतरतोय
अश्रुचा एक थेंब, कोसळण्याची
वाट बघतोय

सगळंच आता संपलय
मन मात्र आता जाणीवेच्या
पलिकडे जाऊन मुक्त
मुक्त झालंय......

तुझ्या मनात माझ्या मनात
काहीच कसं उरलं नाहीय?

सौ. वर्षा हेमंत फाटक, पुणे
20/5/2024

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »