एक समस्या जी समस्याच नाही आहे खरंतर.. (शतकोटी रसिक)


समस्या म्हणजे एखादी अडचण, बाधा पण ती संकटासारखी फार मोठी नसते, खुप गुंतागुंतीची पण नसते तरीही ती माणसाला विचार करायला भाग पाडते, त्यातून मार्ग काढण्यासाठी थोडे परिश्रम घ्यावे लागतात हे नक्की.

मग मी विचार करायला लागले की एक समस्या जी समस्याच नाहीय खरंतर....
मग सर्वात पहिले नवऱ्याच्या दृष्टीकोनातून विचार केला. बायको ही समस्या वाटते पण खरंतर ती समस्याच नाही आहे.
नोकरी ती पण नाही(फुकट पैसे कोण देणार). गर्दीच्या वेळी कामावर उपस्थित राहणे ही समस्या नाही होऊ शकत. मुंबईकरांनी या समस्येला आपलंस केले आहे.

मग मी बिरबलाच्या दृष्टीने विचार करायला लागले की अशी कोणती गोष्ट आहे की जी एक समस्या आहे पण खरंतर नाही.
(मला तर हा त्या पठडीतलाच विषय वाटला)
मग *आव्हान* हा शब्द डोक्यात आला आणि प्रकाश पडला.

समस्या जी समस्याच नाही आहे कारण खरंय ते एक आव्हान आहे, एक मिळालेली संधी आहे.स्वत्ःला सिद्ध करायची.

कित्येक जणांना या समस्येचा सामना करावा लागतो. अपयश येतं. पैशाची, आरोग्याची, मानसिक कोणत्याही प्रकारची समस्या असू शकते. काही समस्या या निरंतर सोबत करतात आणि समस्या न राहता जीवनाचा अविभाज्य भाग बनतात.
तुम्हांला तिचा सामना करता येतो की नाही यावर तिचे स्वरूप अवलंबून आहे.

दोन दिवस तर हा विषयच माझ्यासाठी समस्या झाला होता.
म्हणजे या गोष्टीचा एक टक्का त्रास होत होता(कारण काहीच लिहायला सुचत नव्हते ) आणि ९९% फायदा होतो आहे (कारण विविध प्रकारे विचार करायला लागत होता) तर मग ती समस्या आहे का?
ज्ञानात तर भर पडते आहे.

कदाचित उलटं असेल तर.... ९९ % त्रास होतो आहे.

मग ते आव्हान समजा!! अर्थात शब्द बदलून परिस्थिती बदलणार नाही पण आपले विचार बदलून तर नक्कीच बदल घडू शकतो.कारण आव्हान या शब्दाला वजन आहे ते समस्या या शब्दाला नाही.

बाजूच्या घरी जोरात रेडियो लावला आहे आणि आपल्याला खूप त्रास होतो आहे. आली की नाही समस्या!
पण तो रेडियो आपल्यासाठीच लावला आहे हा एक समज करून सुखात झोपणे
किंवा
हिंमत करून त्याला जाऊन आवाज कमी करायला सांगणे
किंवा
चडफडत स्वतःच्या झोपेची वाट लावणे.

मी नेहमी दुसरा उपाय करते. चान्स घेतलाच नाही असे नको व्हायला. दरवाजेपे गाडी खडी थी आणि.... एखादा चांगला असेल तर रेडिओ बंदही करतो.

एखादा आगाऊ असेल तर आपल्याला विचारून आपल्या आवडीच्या गायकाची गाणी लावतो आणि ऐकतो!!
थोडक्यात आपली बोलती बंद करतो पण पन्नास टक्के तरी त्रास कमी झाला असतो.

समस्या अशीही सोडवली जाऊ शकते.

बरेचदा आपण बोलायला घाबरतो किंवा बिचकतो म्हणू शकतो. पण नीटपणे समोरच्याला सांगितले तर नक्कीच फरक पडतो आणि समस्येवर तोडगा निघू शकतो.

अर्थात परिस्थिती आणि परिणाम प्रत्येक वेळी आपल्या हातात असतातच असे नाही.

पण हिंमत, सारासार विचार, परिस्थितीचा सखोल अभ्यास करून प्रयत्न केला तर एखादी समस्या समस्या राहातच नाही खरंतर.............

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »