सागर किनारे हे दोन शब्द वाचल्यावर मला काय तुम्हांला सर्वांनाच सागर किनारे दिल ये पुकारे... हे गाणे आठवले असेल पण त्या बरोबरच एक दूजे के लिए या सिनेमातील वासू - सपना ही आठवतील. म्हणजे काय प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी /क्षण जपणारे हे सागर किनारे आठवणींचे पुस्तक असेल. कधीतरी, कोणीतरी किनाऱ्यावर बसून तिच्या आयुष्याचे पुस्तक एकटीच वाचत बसली असेल. मिळालेल्या /गमावलेल्या गोष्टींकडे तटस्थपणे बघत असेल. तिथे मिळणारा सुकून हा हवाहवासा, मनाशी संवाद साधणारा असेल.
पण कधी कधी हा सागर किनारा फार वेगळा भासतो. भरतीच्या वेळी वेगळा, उत्साहाने सळसळता तर ओहोटीच्या वेळी एखाद्या कर्मयोगाप्रमाणे स्वतःला रिते करून दूर कुठेतरी निघून जाणारा, शांत, धीरगंभीर! संध्याकाळची तर ओहोटी नकोशी होते. आयुष्यातल्या सर्व गोष्टींचा शेवट होतो आहे की काय असे फिलिंग येतं राहतं. मग सागर एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे वाटतो, आयुष्याला घाबरून दूर पळणारा माणूसच जसा काही!!
कधी कधी वाटतं ह्याचा उगम आणि अंत कसा असेल?
ह्याच्या मनात काय काय दडले असेल?
किती पावसाळे ह्याने बघितले असतील? हा विचार मनात येताच माझंच मला हसायला आलं. पावसाळे? कितीतरी युगांचा हा साक्षीदार असेल. देव दानवांच्या युद्धात बिचाऱ्याची किती बिकट अवस्था झाली असेल?
मनुष्यजातीचा राग आला की हा त्सुनामी आणतं असेल का? धरेशी ह्याच काय नातं असेल? दोघे भांडत असतील का? काय संवाद घडतं असेल दोघांत?
कधी कधी न मला उगाचच बेचैन येते. असं वाटतं की जिथपर्यंत आपली जाणीव पोहचते तिथपर्यंतच माणसाने विचार करावा, उगीचच डोके शिणवू नये पण मन हेही तर सागरासारखंच अथांग असतं, खोल असतं, त्याचा कुठे थांग लागतो, भरकटत जातं मग! लाटांसारखे पुढे मागे होतं राहत. हिंदोळे घेतं. थकलं भागलं की किनारा गाठायचा प्रयत्न करतं. नेहमीच सफल होईलच असे नाही. तळाशी काहीतरी खदखदत असतंच!!
प्रश्नांच्या महासागरात मन कधी गटांगळ्या खातं. खरंतर कल्पनेचा सागर प्रत्येकाच्या मनात आहे म्हणून तर हे जग आनंदी आहे. सुखाच्या कल्पनेत माणूस डुंबत राहतो आणि दुःखाच्या लाटेला दूर सारतो. पण ती लाटचं, ती तिच काम करतंच राहते.
एखाद्याला दुर्गुणांचा सागर का म्हणतात? कदाचित दुर्गुणाच्या मनात काय दडले आहे हे समजत नाही म्हणून असेल.
मनाची खोली सागरापेक्षाही खोल आहे. पण मग या मनाच्या सागराचा किनारा कोणता? समाजाने घातलेली बंधन, नियम की अजून काही?
म्हणजे भरती येते ती बंधन तोडायला हवीत हे सांगून जाते आणि ओहोटी येते ती कधी कधी नमते घ्यावे हे सांगायला तर नसेल येतं?
सागर किनारा न्याहाळतांना एखाद्याला सुंदर आठवणी येत असतील तर काही जण एखाद्याच्या आठवणीत व्याकूळ होत असतील. समुद्र किनाऱ्यावरील शंख, शिंपले आणि सापडणारे मोती या आठवणींना उजाळा देत आनंदाचा आभास निर्माण करत असतील की विरहाच्या वेदनेचा अंत करत असतील?
एखादा अभागी या माणसांच्या जनसागरात कोणीही जिवलग न मिळाल्याने एकटाच असेल, प्रेमासाठी व्याकूळ असेल तर या अफाट जनसागराचा काय फायदा?
तशीही सागर माणसाची तहान कुठे भागवतो?किनाऱ्यावर तो तहानलेलाच तर असतो.
शेवटी सागर काय आणि किनारे काय एकमेकांना धरुन आहेत तोवर ठीक आहे, सागराने मर्यादा ओलांडली की सर्व संपणार आहे.
सागर किनारे मर्यादेच महत्व तर अधोरेखित करतं नसतील......