शेवट

शेवट

(अनिता हातात काठी घेऊन खुर्चीवर बसली असते.
तितक्यात बेल वाजते)

अनिता : दीपक ए दीपक, कुठे गेला हा मला एकटीला या नवीन जागेत सोडून?

(चाचपडत चाचपडत उठते.
मागून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. दचकते.
परत हाक मारते.)

अनिता :दीपक दीपक!!
कोण असेल माहिती नाही. नकोच दार उघडायला.

( दार न उघडता वळते. अंदाज घेत खुर्चीवर येऊन बसते)

अनिता : अरे वा! काय सुंदर वास येतो आहे. निशिगंधाची फुलं आणून ठेवली वाटतं. खरच किती आवडीनिवडी जपतो हा माझ्या.(निशिगंधाच्या फुलांच्या दिशेने हळूहळू जाते. जवळ जाऊन वास घेते)

(तेवढ्यात बेल वाजते. धडपडत काठीचा आधार घेऊन उठते. मधेच पडते)

अनिता :मला एकटीला सोडून कुठे गेला हा! कोण असेल बाहेर? आम्ही इथे येणार हे कोणालाच माहीत नाही आहे.

(दीपक ला फोन लावते. रिंग जाते पण कोणीच उचलत नाही)

अनिता : आॉफिसमधून निघाला असेल बहुतेक म्हणून फोन नाही उचलत आहे. (स्वतःशीच बोलते).

(परत बेल वाजते 4/5 वेळा.दचकते आणि घाबरतच हळूहळू दाराच्या दिशेने जाते.
दार न उघडताच विचारते.)

अनिता :कोण आहे?

(कोणीच उत्तर देत नाही.
तितक्यात दार उघडल्याचा आवाज येतो.)

अनिता : (आनंदाने) दीपक तू आलास. कुठे गायब झाला होता रे? मी घाबरले होते नं! दीपक दीपक अरे बोलत का नाही आहेस?(जाऊन त्याला मिठी मारते.)

दीपक : आईग! खूप दुखतंय , धडपडलो जरासा बाहेर. देवा! पायालाही खूप लागले आहे.डोक्यातून रक्त येत आहे गं माझ्या. बसुदे मला जरा.

(दीपक खरतंर आरामात बसला असतो सोफ्यावर)

अनिता : अरे आपल्या बॅगेत मलम असेल बघ. थांब मी काढते सामानातून.सामान कुठे आहे आपलं? मी अजून धडपडायची. तू दे न मला बॅगेतून मलम काढून.

दीपक : तू आहेस तिथेच बस गं. मी मॅनेज करतो.सगळं सामान पडलंय इकडे तिकडे.
उठू नकोस. केवढी मोठी बॅग आहे ही तूझी. हे सगळं किचनचं सामान.केव्हा आवरणार मी हे सगळं?

(काहीच सामान नसतं)

अनिता : अरे दीपक तूला खरंच किती काम पडतरे. माझी आंधळीची तूला काहीच मदत होत नाही.
(दीपक तिला जवळ घेतो)

दीपक: अग प्रेम केलं आहे मी तुझ्यावर. असं नको बोलूस.

अनिता : मगाशी दोनदा बेल वाजली रे. मी नाही दार उघडले. एकतर मी अशी आंधळी आणि ही नवीन जागा.

दीपक : बरं केलंस नाही उघडलं दार.

(तितक्यात परत बेल वाजते. बाहेरून एक मुलगी येते. ती आणि दीपक एकमेकांकडे पाहून खाणाखुणा करतात. फ्लाईंग किस देतात.)

अनिता ः अरे कोणी आलं आहे का घरात?बेल वाजलीन? मला काहीतरी जाणवतेय रे.नवीन परफ्यूमचा वासही येतो आहे. दीपक जरा बघन.

दीपक: (त्या मुलीला जवळ घेत.) अग एक बाई आली होती काम आहे का विचारायला? गेली ती. कोणीच नाही आहे आता इथे. शांत बस जरा.पाणी देऊ का तूला?

अनिता : किती करशील रे माझं? कशाला रे माझ्याशी लग्न केलं?

(तो आणि ती मुलगी एकमेकांजवळ बसतात.)

दीपक: अग मी प्रेम करतो ग राणी तुझ्यावर!

अनिता : खूप नशिबवान आहे रे मी! दीपक मला जरा थकल्यासारखं वाटतं आहे. बेडरूममध्ये घेऊन चलन.मला का वाटतं आहे की इथे अजून कोणीतरी आहे असं.

दीपक: नाही गं. तू थकली आहे. झोप थोड्यावेळ.

(दीपक तिला आत घेऊन जातो आणि दार बाहेरून बंद करतो)

(तितक्यात फोन वाजतो. दीपक उचलतो आणि बोलतो
दीपक: हो एका तासाने या. माल रेडी आहे. पाठवा तुमच्या माणसांना.


दीपक : शीतल तू इथे आत्ता कशाला आलीस? तिला विकून आलेल्या पैशात आपण मजाच करणार आहोत नं. ती वासावरुन लोक ओळखते.या आंधळ्या लोकांच नाक अतिशय तिक्ष्ण असतं. तू जा आता. ते 4/5 जण येतीलच तिला न्यायला. त्यांचा आत्ताच फोन आला होता.

शीतल : ऐक न मला एक लाख हवे होते. आपल्या लग्नाच्या शॉपिंगसाठी.

दीपक : थांब देतो. अरे तू अपनी जानेजिगर हैं।
या अनितासारख्या आंधळ्या आणि बावळट पोरींना विकून खूप पैसे मिळवले आहेत मी! पण तू मात्र खासचं आहे यार!
(तिला परत जवळ घेतो)
शीतल पैसे मोजते.

शीतल : (बॅगेतून बाटली काढते) दीपू सेलिब्रेशन करुयात का? ते ध्यान उठायच्या आधी! वैताग आहे रे ती. कस काय सहन करतो रे तिला?

दीपक : का नाही? सेलिब्रेशन तो बनता है!
अग अजून एक तास तिला सहन करायचं आहे. पैसे के लिए कुछ भी!

(शीतल आत जाऊन दोन ग्लास आणते.)

(आतून अनिता जोरजोरात दार वाजवते.
दीपक आणि शीतल दुर्लक्ष करतात. दीपक जसा ग्लास तोंडाला लावतो तसा बेशुद्ध पडतो.)

शीतल त्याला हलवून बघते आणि तो उठतं नाही बघितल्यावर हलकट म्हणून जोरात त्याला लाथ मारते.

अनिता : दीपक दीपक (जोरात हात मारते.)

(शीतल जाऊन दार उघडते.
दोघी एकमेकींना मिठ्या मारतात.)

अनिता : (काठी आणि गाॅगल फेकते.)

अनिता :मेला का ग हलकट!
आंधळ्या लोकांच्या आयुष्याशी खेळतो. पण आपल्या दोघींचा प्लॅन यशस्वी झाला. आता रोज रोजच्या चोऱ्या बंद!

शीतल: एकदम मोठ्ठा हात मारला आपणं.अशा माणसाला लुबाडायला तर काहीच वाटतं नाही.

(दोघीही एकमेकींना टाळी देत हसतात.
शीतल त्याच्या गळ्यातली चेन, घड्याळ काढून घेते)

अनिता : चल आपल्या आजच्या शाॅपिंगची सोय झाली. तू मात्र त्याला मस्त घोळात घेतलंस.
पण या हरामखोराच आता काय करायचं?

शीतल : तसाही तो 4/5 तास काही उठणार नाही. तू काळजी नको करु.

अनिता फोनपाशी जाते आणि बोलते:एक धडधाकट माणूस आहे. किडणी, डोळे, लिव्हर जे हवं ते घ्या. पन्नास लाख! सौदा मंजूर?

फोनवरून आवाज: मंजूर!

अनिता फोन ठेवून मागे वळून बघते तर

(शीतल गुडघ्यावर बसली असते आणि दीपकने तिच्या डोक्याला गन लावली असते.
समोर अनिता भांबावलेल्या नजरेने बघत दोन्ही हातवर करते आणि तितक्यात बेल वाजते.

हळूहळू पडदा पडतो.


वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »