सिनेमा सिनेमा

सिनेमा सिनेमा

सिनेमा सिनेमा

सिनेमा हे पण एक शिक्षणांचेच माध्यम आहे. इच्छा असेल तर आपण बरेच काही शिकू शकतो.
मग मी विचारात पडले की आपण खरोखरच सिनेमातून काय शिकू शकतो?कारण सिनेमा हा पण एक समाजाचा आरसा आहे. समाजात आढळणारे प्रेम, द्वेष, त्याग, खुन्नस सगळे भाव सिनेमात असतात. तिथेही माणसं चूकतात आणि इथेही.

आईंदा ऐसी गलती नहीं होगी।
भगवानके लिए मुझे माफ कर दो।
मैं कसम खाती हूँ की आपको शिकायत का मौका नही दूँगी वगैरे वगैरे.
ही वाक्ये आपण बरेचदा ऐकतो आणि याचा इम्पॅक्ट हिंदीतच जास्त वाटतो.

मग या सिनेमातील चूका पाहून आपण खऱ्या आयुष्यात होणाऱ्या चूका टाळू शकतो का?

अमर अकबर अँथनी ह्या सिनेमातून काय शिकायच? तर लहान मुलांना कधीही एकटे सोडू नये. ती 100% हरवणारचं.

त्रिशूल ह्या सिनेमातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. समोरची तरणीताठी व्यक्ती अगदी खूपच खुन्नस ठेवून वागत असेल तर ती व्यक्ती आपला मुलगाही असू शकते. उगीच त्याला मारायची सुपारी वगैरे न देता थोडसं भूतकाळात डोकावून पहावे.चमचमणारे दिवे दिसतील.

एकाच वयाच्या दोघी बहिणी/मैत्रीणी लग्नाच्या असतील तर स्पष्टपणे नक्की कोणावर प्रेम आहे ते लगेच सांगून टाकावे.उगीचच गैरसमज होऊन जिच्यावर प्रेम नाही तिच्याशीच लग्न करायची वेळ येऊ शकते. तोहफातल्या जितेंद्र ने केलेली चूक करु नये.आपण टाळू शकतो.


कितीही घाई असली तरी ओढणी /स्कार्फ गळ्यात अडकवून बाईक चालवू नये. जिवावर बेतू शकतं. इजाजत मधल्या हिरोइनसारखं.

आणि अजून लग्न झाल्यावर उगीच जुनी प्रेमपत्रं जपून वगैरे ठेवू नये कारण ही फार मोठ्ठी चूक अंगाशी येऊ शकते. संगम आणि सफर सिनेमा सारखी. लगेच फाडून टाकून कचर्‍यात फेकावी नको जाळूनच टाकावी! उगीच कोणीतरी तुकडे जोडले म्हणजे आली का पंचाईत!!!

हो, अजून एक, प्रेयसीला पत्र स्वतःच्या हस्ताक्षरातच लिहावे, मित्राकडून लिहून घेऊ नये. मुकद्दर का सिकंदर सारखं होत मग! आपले वांधे होतात आणि मित्र सुपात असतो. सावध व्हा!

आणि अजून बायको रागारागाने घर सोडून गेली असेल तर ट्रेन आणि फ्लाईट पकडायला वेळेवरच जावे कारण खऱ्या आयुष्यात बायको /प्रेयसी वाट पहात थांबली असेल या भ्रमात राहू नये. (त्या हीरोइन ने तिकीट काढलंच नसतं. आपल्या बायकोने कदाचित काढले असू शकते.)
इथे चूक ही चूकच आहे असे ग्राह्य धरले जाणार नाही.

मतितार्थ काय तर जिंदगी के साथ कभी इंटरफेअर नही करनेका जैसी चलती है वैसे चलानेका! तर हा डायलॉग ऐकून हातावर हात ठेवून बसून राहायचं की काहीतरी शिकायचं हे प्रेक्षकांवर अवलंबून आहे.

बाकी तर काय तुम्ही प्रेक्षक मायबाप शहाणे आहात. काय घ्यायचे आणि काय सोडायचे ते तुम्हांला ठाऊकच आहे.

सांगून चूक करते आहे की काय???

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »