मला ही एकच म्हण अजिबात आवडत नाही. जुने ते सोने ही म्हण प्रत्येक पिढी दुसऱ्या पिढीला ऐकवत असते.जोपर्यंत नवीन काही निर्माण होणार नाही, तोपर्यंत नविन गोष्ट जुनी कशी होणार?
आणि सिनेमा बाबत पण माझे हेच मत आहे.
आत्ता पण किती वेगवेगळ्या विषयावर मराठी सिनेमे बघतो.कौतुक वाटत.अतिशय सुरेख आशय घेऊन मराठी दिग्दर्शक विषय मांडतात. खर सांगू आधीच्या मराठी चित्रपटात सासू किंवा सून दोन टोक दाखवायचे. कशी काय एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एवढी छळू शकते?समतोल कुठेच नाही. दुसरा प्रकार म्हणजे लावण्या,फड आणि तमाशा ,राजकारण हे विषय असायचे.सचिन पिळगावकर ह्यांनी बऱ्यापैकी मराठी चित्रपटाला श्रीमंती आणली. दोन्ही अर्थाने!
पण त्यांचा अभिनय दिसून आला तो फक्त कट्यार मधेच!
श्वास पासून तर काळ बदललाच.
अर्थात जुन्या सिनेमांना मी दोष देत नाही च पण उगीचच जुने ते सोने म्हणून टिमकी मिरवू नये एवढेच.
कासव,डबलसीट, किल्ला, नितळ,कट्यार हे माझे आवडते मराठी चित्रपट आहेत.अशी ही बनवाबनवी नेहमीसाठीच आवडता.
तेच हिंदी चित्रपटाचे!
जुने हिंदी चित्रपट छान होते अस माझी आई म्हणते,
मी पण माझ्या मुलांना हेच म्हणते कि जुने हिंदी चित्रपट चांगले होते.
आई तेव्हा गुरुदत्त, देव आनंद, शम्मी कपूर बद्दल बोलत असते आणि मी फक्त बच्चन बद्दल बोलत असते.अर्थात बच्चन हे आईच्या,माझ्या आणि मुलीच्या तिन्ही पिढीत आहेत.नियमाला अपवाद!
मला वाटतं तेव्हाच्या परिस्थिती नुसार, चाली,रुढीनुसार ते चित्रपट त्या त्या पिढीला आवडले.त्यांनी त्या चित्रपटांचा आनंद घेतला. अर्थात काही बोधप्रद चित्रपट ही आलेत पण ते किती लोकांनी पाहिले.आधी दारुबंदी वर कितीतरी सिनेमे निघाले, आज ड्रग्जवर निघतात, काही परिणाम होतो का कोणत्याही पिढीवर?सासू-सुनेचा छळ थांबला का ?
तर नाही.म्हणजे पिढी कोणतीही असो.त्या वेळकाळानुसार सगळ चालत.
तेव्हा नायक-नायिका जवळ आले कि दोन फुलं दाखवायचे!
आता जमाना बदल गया हैं।
जे आहे ते पडद्यावर दाखवणार आडपडदा न ठेवता.
पण हा ही समाजातला,पिढीतला बदल आहे,जुन्या पिढीला पटला नाही तरी मान्य करणे भाग आहे.यात त्यांचीही काही चूक आहे अस नाही. आधीच्या पिढीत नायक-नायिका कधीतरी एकमेकांचा फक्त हात धरायचे. तेव्हा सामाजिक, संस्कृतीक वातावरण तसचं होतं.
बदल हा आवश्यकच आहे पटला नाही तरीसुद्धा!
जुने ते सोने ह्या ऐवजी *जे उत्तम ते सोने* अस मला तरी वाटत.प्रत्येकच बाबतीत.