आयुष्याशी संवाद

आयुष्याशी संवाद

आयुष्य: "प्रिय मानवा,काय रे?"

मी: " कोण आहेस तू? जा मर जाऊन तिकडे, माझ्याशी नको बोलूस आणि उपदेशाचे डोस पाजणार असशील तर तोंड बंद ठेव तूझे".

आयुष्य: "किती रे भरभरून प्रेम करायसाच माझ्यावर! खरचं डोळ्यात पाणी आल रे.
पण आज काय झाले आहे तूला? का असा विमनस्क बसला आहेस? उठ जरा. माझ्या कडे डोळे उघडून बघ. का सारखा सारखा मरणाची भाषा करतोस?का लोकांना सांगत फिरतोस कि तुझ्या आयुष्याची फरफट झाली आहे ते? सतत निराशेचे बोलणे का असते तुझे?मला माहिती आहे तू आत्महत्येचा विचार करतो आहेस".

मी: "अरे तू जातोस का आता? आयुष्य म्हणे माझं.
नको मला तू डोळ्यासमोर.
वैतागलो आहे मी तूला!"

आयुष्य: "हे बघ नाहीतरी तू मरणारच
आहेस नं,मग माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन मर न".

मी: "तूझ्या फडतूस प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही."

आयुष्य : अरे, शेवट जवळ आला तरी अहंकार नाही गेला अजून?

मी: अहंकार आणि मला?लोकांनी माझ्या स्वाभिमानाचा चकनाचूर केला आहे, लाथाडले आहे मला.

आयुष्य: स्वाभिमानाचा कि अहंकाराचा?


मी: "तू कोण आलास विचारणारा?

आयुष्य: "सांगितले न मी मगाशीच, तुझे आयुष्य!"

मी: "माझं कोणाही वाचून अडत नाही.तूझ्यावाचुन तर नाही च नाही!"

आयुष्य: "मग कशाला मरतो आहेस,जग नं सुखाने.
अरे देवाने तूला सगळ्या अवयवांसहीत जन्माला घातले आहे, तू अपंग नाही, तूला कोणी जन्माला आल्यावर अनाथाश्रमात टाकल नाही, चांगल्या आईवडिलांच्या छत्रछायेत वाढलास,गरीबीचा स्पर्श पण तूला झाला नाही. अजून काय हवं रे तूला?
तू माजोरडा आहे, स्वार्थी आहेस,डरपोक आहेस".

मी: "नाही! मी स्वार्थी,डरपोक नाही! मला अजून नोकरी मिळाली नाही. मुलाखतीत मला काहीच आले नाही.मी फेल झालो.लोकांना कस तोंड दाखवू आता?

आयुष्य: "किती लोक आले रे तुला नोकरीबद्दल विचारायला?"

मी: (पुटपुटलो) कोणीच नाही.

आयुष्य : "सगळ कस सहजासहजी मिळेल रे?थोडे दुःख, अपमान,अपयश सगळ्यांची चव चाख,मजा येईल,तावून सुलाखून बघ स्वतः ला जरा. रड्या नको होऊस."

मी : "मी बघतो काय करायचं ते".

मी हळूच हातातली झोपेच्या गोळ्यांची बाटली खिडकीतून बाहेर फेकली.

(कोणीतरी हसल्याचा भास झाला मला)

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »