आज मोगर्याच्या झाडाला एक टप्पोरी पांढरीशुभ्र कळी आली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. Flat घेतल्यानंतर पहिले 7/8 कुंड्या विकत आणल्या. मग माती आणली. आयुष्यात माती कधी विकत आणू अस वाटलच नव्हत. नंतर गुलाब ,कण्हेर ,जास्वंद आणि मोगरा ही सगळी रोप आणून झाली आणि आज ती कळी बघून सार्थक झाल.
लहानपणापासून मी फूलवेडी होते (फूल आणि वेडी असा वेगवेगळा अर्थ घेऊ नये). घरी विविध प्रकारची फूल होती. डेझी, क्रोटन आणि पाम: याच फूल फार सुंदर असत. पिवळी, झापरी आणि बटण शेवंती होती. भुईचाफा तर फारच सुरेख होता. त्याचा वास दूरवर यायचा. ब्रह्मकमळ पाहिल कि मला त्याची आठवण येते. पिवळी काटेकोरांटी काय दिसायची. एक फूल वाहिल कि देवाला सोन अर्पण केल अस समजायचे. त्यात पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाची पण काटेकोरांटी होती पण पिवळ्या काटेकोरांटीच सौंदर्य काही वेगळच होत.
श्रावणात लाल गणेशवेल आणि निळी गोकर्ण खूप यायची. गुलछडी विविध रंगात यायची. रेखा मावशी कडची गुलछडी कधीच विसरु शकत नाही. केवढे रंग होते Amazing!! तेव्हा फोटो का नाही काढले अस वाटत. अर्थात मनाच्या कँमेरातून ते कधीच delete होणार नाहीत. मंगळागौरीच्या वेळेस कितीतरी पत्री तोडायचो, कितीतरी फूल तोडायचो पण कधी कोणी डोस नाही पाजले कि पान नका तोडू पर्यावरणाचा र्हास होईल. कारण तेव्हा आपण भरपूर झाड पण लावत होतो. जमीन available होती.बोराची, लिबांची, चिंचेची, बाभळीची झाडे भरपूर होती. निर्गुडीच्या झाडाचे तूरे आणि त्यावर ची नाजूक जांभळ्या रंगाची फुल किती गोड दिसायची. घंटीची पिवळी फुले खूप छान दिसायची आणि त्या झाडाच्या बिट्टया खेळायला घ्यायचो. बाबांनी किती तरी प्रकारची कर्दळ लावली होती. लालभडक, पिवळी आणि एक अबोली रंगाची.
एकदा तर वेली गुलाबाला 40 फूल आली होती. मी आणि ताई फूल मोजायचो. आई गुलकंद पण करायची. फडके काकूंकडे जो मोतिया गुलाब होता तसा गुलाब नंतर कधीच नाही पहाण्यात आला.
उन्हाळ्यात निशिगंध आणि मोगरा मस्त फुलायचे. रात्री अंगणात फेर्या मारतांना अरुणा काकू कडच्या रातराणी चा वास दरवळायचा. खूप प्रसन्न वाटायच. तशी मला चमेली खूप आवडते. संध्याकाळी उमलतांना तिचा वास आणि अरध्या उमललेल्या कळ्या. काय सुंदर दिसतात. फूल पूर्ण उमलले की मात्र सौंदर्य जात पण सुवास मात्र तोच राहतो. पण चमेली आमच्याकडे लागलीच नाही. मंदामावशी कडे गेली कि मात्र मी हमखास चमेलीचा गजरा करायची. तसच अबोली पण खूप होती घरी. कोणत्याही फुलाबरोबर शोभायची किंबहुना तिच्या मुळे इतर फुलांच्या गजर्याला शोभा यायची. मोगरा-अबोली, कुंदा-अबोली, जाई-अबोली. सगळ्यात अबोली उठून दिसायची.
तशीच मजा गुलबक्षी च्या फुलांची. ती फूल संध्याकाळीच उगवायची. त्या फुलांची चपटी वेणी करायचो. एकात एक गुफुंन. त्यातही राणीकलर, पिवळा, पांढरा, ठिपके असलेले असे रंग होते.
गणपती त तर मी खुप मोठे आणि सुंदर हार करायची. माझा तो छंद होता. अजूनही आहे. फुलवाल्याकडे मोगरा आला की मी विकत आणतेच. मग 200 रू असो कि 300 रु असो. गजरा करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. एक एक फूल एकमेकात गुंफत जायच. किती छान न!! अबोली ची फूल विकत मिळत नाही याच खूप वाईट वाटत.
बाबांनी पपई, लिंबू आणि पेरू पण लावला होता. पपया तर खूपच लागायच्या. मला आठवत दादासाहेब एकदा अमरावतीहून आले होते आणि त्यांनी मागच्या अंगणात कणस लावली होती. 7/8 कणस लागली होती. डाळिंब आणि सीताफळ पण खूप लागायची.
आमच्या घरी उंबराच झाड होत. त्यावर रोज भारद्वाज पक्षी यायचा.
पेरू तोडण हा आमच्या भावडांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. त्याच सगळ श्रेय शेजारच्या कापसे आजींना जात. झाड आमच्या घरी होत पण अर्ध झाड त्यांच्या घरी गेल होत त्यामुळे त्यांच्याशी भांडून पेरू खाण्यात जी मजा आली ती कुठेही नाही आली. शेवग्याच्या शेंगाच पण तसच. औंध ला 35/40 रु ला पाव किलो शेंगा घेतांना घरच्या शेंगांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. कढीपत्ता तर पेरुच्या झाडाएवढा वाढला होता. एक माणूस गवत कापायला आला कि भरपूर कढीपत्ता तोडून न्यायचा. मला खूप राग यायचा पण बाबा त्याला कधीच ओरडले नाही. तो बाहेर जाऊन विकायचा.
फुल भरपूर त्यामुळे फुलपाखरं आणि पक्षी पण खूप यायचे. पांढऱ्या वर काळी ठिपके असलेली छोटी फूलपाखर, पिवळी ,चाँकलेटी कलरची मोठी कितीतरी फुलपाखरं यायची पण अटलांटाच्या Butterfly Garden मधे पाहिलेली फुलपाखरं मात्र कुठेच नाही पाहिली. अप्रतिमच!! पोपट आणि माकडे दोघेही पेरू आणि पपया खायला यायचे पण माकडांसारखी नासधूस कोणत्याच पक्षाने नाही केल.शेवटी माणसाचे पूर्वज न ते!!
थोडक्यात काय आमच आयुष्य या निसर्गामुळे रंग-बिरंगी होत.अर्थात आपण जर ठरवल तर आपल्या आयुष्यात आपण केव्हाही रंग भरू शकतो.